बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलचं गाजलेलं पाहायला मिळत आहे. आज दोन महिने झाले असून देखील या घटनेचा योग्य तो तोडगा काढलेला नाही. शिवाय या प्रकरणात मंत्री धनंजय देशमुख यांच्या राजीनाम्यावर अजून देखील जोर धरला गेला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं पाहायला मिळत आहे. या प्रकरणासंबंधी वाल्मिक कराडला अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या आरोपीचा पळून जातानाचा व्हिडीओ समोर आला आणि मोठी खळबळ उडाली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्हिडीओनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. यादरम्यान धनंजय देशमुखांनी देखील गंभीर आरोप केला आहे. आरोपीला पळून जाण्यासाठी टीप पोलिसांनीच दिल्याचा खळबळजनक दावा संतोष देखमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे. संतोष देशमुखांचे मारेकरी भर रस्त्यात गाडी लावून गाडीतून उतरून पळून गेले. यावेळी हाकेच्या अंतरावर पोलीस होते. गाडीचा पाठलाग करुन देखील हे आरोपी का सापडले नाहीत? पोलिसांच्या अभयामुळेच आरोपी मोकाट आहेत . आरोपींना पुढे पोलीस असल्याची टीप कोणी दिली? तो पोलीस कर्मचारी होता का? असा प्रश्न धनंजय देशमुखांनी उपस्थित केला आहे.
टीप देणारा पोलीस कोण??
सुरुवातीचे काही दिवस तपास कुठल्या पद्धतीने केलेला आहे याच्यावर खूप मोठी शंका आहे. सीआयडी आणि एसआयटीकडे जो तपास दिलेला आहे तोच पुढे व्यवस्थित सुरु आहे. समोरून आरोपी पळताना दिसत आहेत मग या आरोपीचा शोध का लागत नाही? पळून जाणाऱ्या आरोपीमध्ये कृष्ण आंधळे पण आहे. हत्येच्या सुरुवातीच्या वेळी तपास गांभीर्याने घेतला नाही. पुढे पोलीस आहेत याची टीप कोणी दिली. याची माहिती कॉल डिटेल्समधून निघेल. कुठल्या पोलीसाने फोन करून सांगितलं होते का? याचा देखील तपास केला पाहिजे, असे धनंजय देशमुख म्हणाले.