बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीने जलद गतीने सुरू केला आहे. हत्येप्रकरणी सीआयडीने शंभरून अधिक जणांची चौकशी केली आहे. सीआयडीची 9 विशेष पथकं आहेत.
यासोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपींचं बँक खातं गोठवण्यात आल्याची माहिती मिळत. तसेच आरोपींचे पासपोर्टही रद्द करण्यात आले आहेत. आरोपींचा देशाबाहेर पळून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड लवकरच सरेंडर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराडविषयी एक माहिती समोर येत आहे. 11 डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी वाल्मिक कराड फरार आहे. 11 डिसेंबरला वाल्मिक कराडनं उज्जैनला महाकालेश्वराचं दर्शन घेतल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच वाल्मिक कराडचा मोबाईल 13 डिसेंबरपर्यंत सुरु असल्याची माहिती मिळत आहे. वाल्मिकने देवदर्शनाचे फोटो पोस्ट केले होते. 13 डिसेंबरपर्यंत तो मध्यप्रदेशातच असल्याचे मोबाइल लोकेशनवरून स्पष्ट झाले, पण नंतर मोबाइल बंद झाल्याने त्याचा शोध लागलेला नाही.