गाव-खेड्यांमध्ये मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांचा मोठा आधार असतो. मात्र अनेक गावांतील शाळांची अवस्था अत्यंत बिकट झालीय. बीड जिल्ह्यातील शेकडो शाळा अशा आहेत, ज्यामध्ये मुलांना पाठवायचं कसं? असा सवाल पालक विचारतायत. कोसळलेला स्लॅब. वर्गात उगवलेलं गवत आणि प्लास्टर कोसळलेल्या भिंती अशी शाळांची अवस्था होऊन बसलीय.
बीड जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचे वर्ग 13 वर्षापासून झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडमध्ये भरतात. तर काही शाळांसाठी भाडेतत्वावर खोल्या घेतल्यात. वायकर वस्तीतली ही शाळा चार ते पाच वर्षांपासून पडलेल्या अवस्थेत आहे. एक वर्ग आहे, तोही कधीही कोसळू शकतो. या शाळेसाठी ज्यांनी जमीन दिली त्यांनी याबाबत संताप व्यक्त केलाय. सरकारला ही शाळा बांधायची नसेल तर आमची जागा रिकामी करून द्यावी अशी मागणी ते करतायत.
आपली मुलं शिकावीत, पुढे जावीत. हे स्वप्न उराशी बाळगून पालक मुलांना शाळांमध्ये पाठवतात. गावखेड्यातील अनेक पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळांचा मोठा आधार असतो. मात्र या शाळा अशा पडक्या अवस्थेत असतील तर मुलांच्या शिक्षणाचं कसं होणार? आणि मुलांच्या जिवाला काही झालं तर, त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता विचारला जातोय. बघूया, झोपलेलं बीड जिल्हा प्रशासन कधी जागं होतंय.?