भंडारा तालुक्यातील परसोडी परिसरात शनिवारी सायंकाळी एक अनोखी आणि धक्कादायक घटना घडली. सायंकाळच्या सुमारास काही मुले शेकोटीजवळ बसलेली असताना अचानक आकाशातून जळत असलेले दोन तुकडे थेट जमिनीवर कोसळले. ते पडताच परिसरात तेजस्वी उजेड पसरला आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
हे तुकडे फिकट रंगाचे, छिद्रयुक्त आणि वजनाला अतिशय हलके असल्याचं दिसून आलं. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी हे दोन्ही तुकडे ताब्यात घेतले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागालाही कळवण्यात आलं आहे. सुदैवाने या प्रकारात कुणालाही इजा झाली नाही.
सुरुवातीला परिसरात असलेल्या कारखान्यांमुळे वेगवेगळे तर्क लावले जात होते, मात्र हे आकाशातून पडल्याने उल्केचा किंवा अवकाशातील कचऱ्याचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तुकड्यांचा नेमका उगम शोधण्यासाठी कोलकाताहून तज्ज्ञांची टीम भंडाऱ्यात येणार असून तपासानंतरच रहस्य उघड होणार आहे.