विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ झालेला बघायला मिळाला. अशातच आता बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो समोर आले आहेत. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामादेखील दिला आहे. अशातच आता महाराष्ट्रातील राजकारणातून एक नवीन अपडेट समोर आली आहे.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलं आहे.
भास्कर जाधव हे शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते सध्या गुहागरचे आमदार आहेत. त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे.