चिपळूणमधील एका जाहीर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रकृती अचानक बिघडून त्यांना भोवळ आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेली भावनिक आणि जिव्हाळ्याची प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वी चिपळूण येथे आयोजित कार्यक्रमात नारायण राणे भाषणासाठी उभे राहिले असताना त्यांची तब्येत काहीशी ढासळलेली दिसत होती. भाषण सुरू असतानाच त्यांना अचानक भोवळ आली. त्यामुळे त्यांनी आपले भाषण मध्येच थांबवले. तत्काळ त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली. शरीराने साथ दिली नसली तरी राणे यांचा कामाचा उत्साह मात्र कायम असल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले.
या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी राजकारण्यांच्या धावपळीच्या जीवनशैलीवर आणि नारायण राणेंशी असलेल्या जुन्या संबंधांवर सविस्तर भाष्य केले. राजकारणात काम करताना मतभेद, कटुता येते, परंतु मनात कुठेतरी जिव्हाळा कायम असतो, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
राजकारणी माणसाला सुट्टी नसते
राजकारण्यांच्या जीवनशैलीवर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “राजकारणाची पत किंवा अनुभव नसताना अनेक जण लोकप्रतिनिधींना उपदेश देतात. मात्र एका लोकप्रतिनिधीला २४ तास काम करावे लागते. राजकारणी माणसाला ना सुट्टी असते, ना सण-उत्सव. सतत लोकांच्या गराड्यात राहून काम करावे लागते. या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ९९ टक्के राजकारण्यांना वेळेवर जेवणही मिळत नाही, त्यामुळे शरीराची मोठी हाळसांड होते.”
जुने ऋणानुबंध पुसले जात नाहीत
नारायण राणेंशी असलेल्या संबंधांबाबत बोलताना भास्कर जाधव भावूक झाले. “मी आणि नारायण राणे यांनी अनेक वर्षे खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आमचे केवळ राजकीयच नव्हे, तर कौटुंबिक संबंधही होते. माझं स्पष्ट आणि बेधडक बोलणं, आक्रमक बाणा राणे साहेबांना नेहमीच आवडत आला. आमच्या वयात अवघ्या पाच ते सहा वर्षांचे अंतर आहे.
राजकीय प्रवासात काही वळणांवर आमच्यात अंतर पडले, कटुता आली, मात्र जुने ऋणानुबंध कधीच पूर्णपणे पुसले जात नाहीत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
जुने वाद पुन्हा चर्चेत
यापूर्वी नारायण राणे यांनी आपल्या मुलाला उद्देशून “तुमच्यामुळे आमच्यातील संबंध बिघडले” असे विधान केले होते. त्यावर निलेश राणे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेला हा जिव्हाळा आणि आपुलकी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
थोडक्यात
चिपळूणमधील एका जाहीर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रकृती अचानक बिघडली
कार्यक्रमादरम्यान त्यांना भोवळ आल्याची घटना घडली
घटनेनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली
भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया भावनिक आणि जिव्हाळ्याची असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
जुने राजकीय संबंध आणि वैयक्तिक नाते त्यांच्या प्रतिक्रियेतून ठळकपणे दिसून आले