Chhagan Bhujbal : आंतरवली दगडफेकीवर भुजबळांचा गौप्यस्फोट; शरद पवारांवर थेट आरोप Chhagan Bhujbal : आंतरवली दगडफेकीवर भुजबळांचा गौप्यस्फोट; शरद पवारांवर थेट आरोप
ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : आंतरवली दगडफेकीवर भुजबळांचा गौप्यस्फोट; शरद पवारांवर थेट आरोप

आंतरवली प्रकरण: भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप, मराठा आरक्षण आंदोलनात नवा वाद.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने गाजलेल्या आंतरवली सराटी प्रकरणावरून ज्येष्ठ ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.

  • आता राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने गाजलेल्या आंतरवली सराटी प्रकरणावरून ज्येष्ठ ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलिसांवर झालेली दगडफेक ही पूर्वनियोजित असल्याचा दावा करताना त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. यामुळे आता राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

आंतरवली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना मोठा गोंधळ झाला होता. पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत तब्बल 83 पोलिस जखमी झाले. या पार्श्वभूमीवर बोलताना भुजबळ म्हणाले की, ही घटना अचानक घडलेली नव्हती, तर तिचा प्लान आदल्या रात्रीच ठरवण्यात आला होता. त्या वेळी पवार साहेबांचा एक आमदारही त्या बैठकीत सहभागी होता. वस्तुस्थिती माहीत असूनही शरद पवार त्या ठिकाणी गेले, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

भुजबळ यांनी यावेळी ओबीसींशी संबंधित काही प्रमाणपत्रे दाखवत ती बनावट असल्याचा आरोपही केला. एका प्रमाणपत्रावर खाडाखोड करण्यात आल्याचे, तर दुसऱ्यावर ‘मराठी कुणबी’ असे लिहिलेले असल्याचे त्यांनी सांगितले. खोटी प्रमाणपत्र तपासण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली.

शिंदे समितीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. शपथपत्रांच्या आधारे निर्णय घेणे हे कुठेही मान्य नसल्याचे आणि ते संविधानात बसणारे नसल्याचे भुजबळ म्हणाले. यासाठी त्यांनी उदाहरण देत सांगितले की, एका ताटात दोन जण जेवायला बसले असताना मध्येच तीन-चार जण घुसले, तर गोंधळ होतो. त्याचप्रमाणे एका समाजाच्या हक्कावर दुसऱ्यांना बसवणे योग्य नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधत भुजबळ म्हणाले की, निवडणूक आली की ते आघाडीवर येतात. माझ्या मतदारसंघात ते दोन दिवस आले, त्यामुळे मराठा मतं माझ्याविरुद्ध गेली. पण ओबीसी, एससी, एसटी आणि इतर समाजघटक माझ्या पाठीशी उभे राहिल्याने मी विजयी झालो. त्यामुळे ओबीसी समाजाने एकजुटीने उभे राहिले, तर कोणतीही लढाई जिंकता येऊ शकते, असे आवाहन त्यांनी केले.

तेली, माळी, धनगर यांसारख्या जातींचा उल्लेख करत भुजबळ यांनी ओबीसी समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले. निवडणुकीत जरांगे पाटील यांना समर्थन करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. ओबीसी म्हणून संघटित झालो, तर कोणताही संघर्ष जिंकणे अशक्य नाही, असे ठाम विधान करत भुजबळ यांनी आपला मुद्दा मांडला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा