ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी आज पक्षातील उपनेता पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होत्या. मात्र आता ते बाहेर पडणार असून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
राजन साळवी गेले अनेक वर्ष आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत होते. कोकणात लांजा, राजापूर व साखरपा यांचा एक वेगळे अस्तित्त्व आहे. त्याच प्रमाणे राजन साळवी यांना मातोश्रीचे निष्ठावंत म्हणूनही ओळखले जात होते. मात्र पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. राजन साळवी आता एकनाथ शिंदेच्या गटात जाणार असल्याचे शिंदेंच्या सेनेला रत्नागिरीमध्ये बळ मिळणार आहे. याआधीही रत्नागिरीतील कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवत शिंदेंच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला.
राजन साळवी गुरुवारी दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. राजन साळवी यांच्या शिवसेनेच्या पक्षप्रवेशाच्या अगोदर राजापूर विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापलं आहे. राजन साळवी यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ नये असा लांजा तालुका कार्यकारिणीने ठराव केला आहे. वरिष्ठ स्तरावरून पक्षप्रवेश होत असल्यास स्थानिक आमदार किरण सामंत यांना विश्वासात घेऊन हा पक्षप्रवेश व्हावा अशी मागणीही केली जात आहे.