(Indian Railway Ticket Booking ) भारतातील बहुतांश नागरिक प्रवासासाठी रेल्वेसेवेचा वापर करतात. मात्र अनेक वेळा रेल्वे स्थानकांवरील तिकीट काउंटरवर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर आता रेल्वे मंत्रालयाच्या सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम (Centre for Railway Information Systems) या संस्थेने एक अत्याधुनिक प्रणाली विकसित केली आहे.
नवीन प्रणालीमुळे एकाच मिनिटात तब्बल दीड लाख रेल्वे तिकिटे बुक केली जाऊ शकतील. सध्या ही संस्था दर मिनिटाला सुमारे 32000 तिकीट प्रवाशांना उपलब्ध करून देते. मात्र या नव्या यंत्रणेच्या अंमलबजावणीमुळे बुकिंग क्षमतेत तब्बल पाचपट वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ वाचणार असून तिकीट मिळवण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.
गेल्या वर्षी देशभरात 850 कोटी रेल्वे प्रवाशांनी ही रेल्वेसेवा घेतली होती. या नव्या प्रणालीमुळे भविष्यात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे रेल्वेला आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे. सदर निर्णय हा फक्त रेल्वे स्थानकावरील तिकीट केंद्रांसाठी मर्यादित आहे ऑनलाइन प्रवाशांना याचा लाभ घेता येणार नाही.
या संदर्भात डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुंबई सेंट्रल यांनी सांगितले की, “ही प्रणाली सुरू झाल्यानंतर प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळणार आहे. तसेच तिकीट दलालांवरही नियंत्रण ठेवता येणार आहे.” रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, ही यंत्रणा संपूर्ण भारतात लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे.