सणासुदीचा काळ जवळ आला की सर्वच कर्मचारी आपल्या सुट्ट्यांचे नियोजन करू लागतात. त्यात जर दिवाळीसारखा मोठा सण असेल, तर घरच्या घरी सण साजरा करण्यासाठी प्रत्येकाला काही खास दिवस हवेच असतात. अशाच पार्श्वभूमीवर दिल्लीतील एका नामांकित पब्लिक रिलेशन्स कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे दिवाळीनिमित्त तब्बल नऊ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे!
‘एलिट मार्क’ या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या या सवलतीमुळे सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कंपनीच्या संस्थापक आणि CEO रजत ग्रोवर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक खास ईमेल पाठवत सुट्टीची घोषणा केली असून, त्यात त्यांनी असा स्पष्ट उल्लेख केला आहे की, "या काळात ऑफिसचे ई-मेलसुद्धा उघडू नका!"
रजत ग्रोवर यांनी आपल्या मेलमध्ये लिहिलं आहे की, “कर्मचारी हे संस्थेचा आधार आहेत. सणाच्या काळात त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवता यावा, त्यांना विश्रांती मिळावी, हे आमचं कर्तव्य आहे.” त्यांनी पुढे हेही सांगितलं की, “या नऊ दिवसांत कुठलीही कामाची जबाबदारी नाही, ईमेल नाहीत, फक्त आनंद, विश्रांती आणि गोड पदार्थ खाणं हाच उद्देश असावा.”
या निर्णयाची माहिती समोर येताच कंपनीतील एक महिला कर्मचारी यांनी LinkedIn वर पोस्ट शेअर करत आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली. त्या म्हणाल्या, “कामाचं ठिकाण आणि वर्क कल्चर कसं असावं याचा आदर्श उदाहरण म्हणजे आमची कंपनी! इथे केवळ प्रॉडक्टिव्हिटीला नव्हे, तर कर्मचार्यांच्या मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्यालाही तितकंच महत्त्व दिलं जातं.”
सामान्यतः HR विभाग सतत कर्मचाऱ्यांच्या अपडेट्स, वेळापत्रक, डेडलाइन यात व्यग्र असतो. पण यंदा HR टीमलाही याच निर्णयामुळे सुखद धक्का बसला आहे. काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, कंपनीत नुकतीच भरती झालेल्या नवीन सदस्यांपासून ते जुन्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना ही सुट्टी दिली गेली आहे.
सध्या अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होम बंद करून कर्मचाऱ्यांना परत कार्यालयात बोलवत आहेत. त्याचवेळी अनेक ठिकाणी टार्गेट्स आणि डेडलाइनच्या दबावाखाली काम सुरू आहे. अशा काळात ‘एलिट मार्क’ सारखी कंपनी कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा विचार करत आहे, ही बाब इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.