राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, सर्वच प्रमुख पक्ष निवडणूक रणनिती आखण्यात व्यस्त झाले आहेत. अशातच पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. पुण्यात सत्ताधारी महायुती तुटल्याची चर्चा जोर धरू लागली असून, त्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. पुणे महापालिकेत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांच्यातील महायुतीत अंतर्गत मतभेद उफाळून आले असल्याची माहिती समोर येत आहे. जागावाटपावरून निर्माण झालेल्या वादामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
अनेक वॉर्डांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याने आणि “सन्मानजनक जागा” न मिळाल्याने पक्षांतर्गत असंतोष वाढला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुण्यात भाजपने स्वबळावर अधिक जागा लढवण्याची तयारी सुरू केली असून, मित्र पक्षांना अपेक्षेपेक्षा कमी जागा देण्याचा प्रस्ताव मांडल्याने मतभेद टोकाला गेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडूनही स्वतंत्रपणे तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी थेट बंडखोरीचा इशारा दिला आहे. महायुती तुटल्यास पुणे महापालिका निवडणूक चुरशीची ठरणार असून, महाविकास आघाडीला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि ठाकरे गटाची शिवसेना यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, महायुतीतील वरिष्ठ नेते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सध्याची स्थिती पाहता पुण्यातील महायुती तुटल्याची चर्चा केवळ अफवा नसून वास्तवात उतरते की नाही, याकडे राज्याचं राजकीय लक्ष लागून आहे. पुणे महापालिकेची निवडणूक राज्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.