मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून रंगत होत्या. आज अखेर या युतीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राची जीआर रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची वरळीतील मेळाव्यात एकत्र उपस्थिती पाहायला मिळाली. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये युती होणार असल्याची चर्चा अधिक तीव्र झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाने मनसेला 70 ते 75 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. या चर्चेमध्ये अधिक फेऱ्या होऊन जागा वाटप निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आरक्षण जाहीर झाल्यानंतर मनसेने 125 जागा लढवण्याची तयारी दर्शवली होती. तथापि, शिवसेना ठाकरे गटाकडून 70 ते 75 जागा देण्याची तयारी दिसत आहे.
या सर्व घटनांचा पार्श्वभूमीवर काँग्रेसने महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून, मनसेसोबत युती करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीला आता अधिक वेग आला आहे, आणि आगामी निवडणुकीत कोणते वळण घेतले जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.