Bihar Election : बिहार विधानसभा निवडणूक 2025 साठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून, सर्व पक्षांनी एकमताने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. नवी दिल्लीमध्ये पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकांनंतर हे जागावाटप अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. या जागावाटपानुसार, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) या दोन्ही प्रमुख पक्षांना प्रत्येकी 101 जागा देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे दोन्ही पक्ष निवडणुकीत समसमान भागीदारीने उतरतील. याशिवाय, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) अर्थात एलजेपी (आर) ला 29 जागा, उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक जनता दल (RLM) ला 6 जागा, आणि जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM) ला 6 जागा देण्यात आल्या आहेत.
भाजपचे बिहार प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सर्व घटक पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरणात जागांचे वाटप पार पडले आहे. एनडीए एकजुट असून आगामी निवडणुकीत विजय निश्चित आहे.” जागावाटपावर आपली प्रतिक्रिया देताना चिराग पासवान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “आम्ही NDA परिवाराने सौहार्दपूर्ण वातावरणात बिहार विधानसभा निवडणूक 2025 साठी जागावाटप पूर्ण केले आहे.”
या निवडणुकीत भाजप आणि जेडीयू या दोघांनाही समान जागा देण्यात आल्याने, यावेळी कोणताही पक्ष ‘मोठा भाऊ’ किंवा ‘छोटा भाऊ’ या भूमिकेत राहणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. एनडीएच्या जागावाटपानंतर आता सर्वांचे लक्ष विरोधी आघाडी 'इंडिया ब्लॉक' कडे वळले आहे. तेथील जागावाटप कसे ठरते आणि कोण कोणते पक्ष कुठे लढतात, याकडे राज्य व देशाचे राजकारण लक्ष ठेवून आहे.