नागपूरमध्ये दोन वर्षांपुर्वी सुरु झालेली पहिली बिलासपुर-नागपूर-बिलासपूर 'वंदे भारत एक्सप्रेस'ला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. याचाच पुरावा म्हणजे 'वंदे भारत एक्सप्रेस' जी याआधी आठ डब्याची होती ती आता प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे 16 डब्यांची करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे आता 16 डब्यांची नागपुर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी रेल्वे प्रशासनाने दिली.
बिलासपुर-नागपूर वंदे भारत सेवा नियमित स्वरूपात धावते. जेव्हा ही ट्रेन सुरु करण्यात आली होती, तेव्हा ही गाडी 16 डब्यांची होती. मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे ती 8 डब्यांची करण्यात आली होती. मात्र नंतरच्या काळात प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता यामध्ये पुन्हा बदल करून या गाडीला 16 डब्यांची करण्यात येणार आहे. 'वंदे भारत या ट्रेन'मध्ये आता डब्यांच्या संख्येत वाढ करून प्रवाशांच्या क्षमतेनुसार सोयी सुविधामध्ये वाढ करण्यात आली आहे. संपूर्णं वातानुकूलित असलेल्या या ट्रेनमध्ये चेअर कार सीट आहेत. ही ट्रेन सुमारे 143 किमीचे अंतर साडेपाच तासात कापते. वंदे भारत या एक्सप्रेस रेल्वे मधील सोयी-सुविधा आणि आरामदायी प्रवास शिवाय जलद गती यामुळे ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.