राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. मुंबईसह २९ महानगरपालिकांसाठी मतदान जवळ येत असल्याने सर्व पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी महायुतीनेही आपला प्रचार वेगात आणला असून त्यासाठी खास पाहुण्यांना मैदानात उतरवले आहे.
भाजपच्या आमदार आणि प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर या मुंबईत प्रचारासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी प्रचार करत दहिसर भागात भव्य रोड शो केला. या दरम्यान त्यांनी थेट मराठीत गाणे सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मराठी माणसाचा मुद्दा चर्चेत असताना, मैथिली ठाकूर यांनी “भाषा आणि राज्यांच्या भिंती न उभ्या करता विकासासाठी एकत्र येऊया” असा संदेश दिला. आपण उत्तर भारतीय असलो तरी मराठी संस्कृतीशी आपुलकी असल्याचे त्यांनी सांगितले. स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरलेल्या मैथिली ठाकूर यांच्या या मराठमोळ्या अंदाजाची सध्या मुंबईत जोरदार चर्चा होत आहे.