विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी 5 डिसेंबरला पार पडला आणि कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला असून विशेष अधिवेशनात आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड झाली असून राज्यपालांच्या दोन्ही सभागृहातील अभिभाषणाने अधिवेशनाची सांगता झाली आहे. याचपार्श्वभूमीवर महायुतीत कोण होणार मंत्री याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
अशातच आता विधानसभेनंतर भाजपचे "मिशन महानगरपालिका" सुरु झाले आहे. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यशानंतर आता भाजपचे लक्ष महानगरपालिका निवडणुकीवर आहे. पुण्यात पार पडलेल्या भाजपच्या साप्ताहिक बैठकीत महानगरपालिका निवडणुकीच्या बाबत चर्चा सुरु झाल्या. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची सुरू असलेली सदस्यता नोंदणीवर कसा भर द्यायचा यावर चर्चा झाली.
पुणे शहरातील प्रत्येक विभागात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काम करण्याच्या रणनीती बद्दल सुद्धा चर्चा केल्या आहेत. प्रत्येक विधानसभेत भाजपाचे किमान 50,000 सदस्य करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला असून पुण्यात 163 पैकी भाजपचे 97 नगरसेवक आहेत, भाजपच्या बैठकीत विधानसभेत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल व देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला आहे.