राज्यात त सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी हे एकत्र लढत असले तरी अनेक ठिकाणी वेगळी समीकरणा देखील पाहायला मिळत आहेत. त्यातच आता भाजपने पुणे महानगरपालिकेसाठी घराणेशाहीला ब्रेक लावत लोकप्रतिनिधींना धक्का दिला आहे. नेमका हा निर्णय काय पाहूयात?
पुणे महानगरपालिकेसाठी भाजपने आमदार, खासदार यांच्या मुलांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी तर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या अगोदर भाजपने गुजरात आणि दिल्ली या ठिकाणी अशाच प्रकारे घराणेशाहीला डावललं होतं
पुणे महापालिकेच्या 165 जागांसाठी भाजपकडून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये 2300 पेक्षा जास्त अर्ज आले होते. त्यात बाहेरील पक्षातून आलेले माजी नगरसेवक देखील आहेत. तसेच उमेदवारी मिळवताना बहुतांश वेळा लोकप्रतिनिधींचा वरचष्मा राहतो. त्यातून तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. परिणामत: विजय न मिळणे किंवा बंडखोरी केली जाते. यामुळे शनिवारी रात्री पक्ष नेतृत्वाने पुण्यामध्ये खासदार आमदारांची मुलं आणि नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांच्या घरामध्ये उमेदवारी देणे भाजपला महागात पडले होते. त्यात अनेकांचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपने घराणेशाहीला नाकारण्यचा निर्णय घेतला आहे.