एकवेळ मुंबई हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला होता. पण राज्यातलं सरकार 2022 साली कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांची शक्ती कमी व्हायला सुरुवात झाली. मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकीला तर फक्त 20 जागांवर ठाकरे गटाला समाधान मानावं लागेल. भाजपने मुंबईतील त्यांची ताकद कायम राखली. तर शिंदे गटाने सुद्धा विधानसभेच्या काही जागा जिंकून मुंबईत प्रवेश केला. उद्धव ठाकरे आणि मनसे यांचा जनाधार घटला. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची आहे, तर भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मुंबई जिंकून ठाकरेंच अजून खच्चीकरण त्यांच्या राजकारणासाठी आवश्यक आहे.
काल भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक मुंबई महापालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात झाली. यावेळी काही जागांवरुन दोन्ही पक्षांमध्ये पेच आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मुंबईतील लालबाग, परेल, दादर, माहीम, भायखळा आणि कुलाबा या पारंपरिक व राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रभागांतील जागांवर पेच आहे. दोन्ही पक्षांनी इथल्या जागांवर दावा केलाय अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदेंची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या काळातील माजी नगरसेवक ज्या प्रभागांतून निवडून आले होते, त्या जागांवर ठामपणे आग्रही. या भागांमध्ये शिवसेनेची पारंपरिक ताकद राहिल्याचा शिवसेनेचा दावा आहे.
भाजपा या जागांवर का दावा करतय?
संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक संपर्काच्या जोरावर त्या जागा आपल्यालाच मिळायला हव्यात, अशी भूमिका शिंदे गटाने मांडल्याची माहीती.दुसरीकडे, भाजपही मुंबई शहरातील याच महत्त्वाच्या जागांवर हिंदुत्ववादी मतांच्या जोरावर हक्क सांगत आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील मतदारसंघांत भाजपची ताकद वाढली असून, शहरी मतदार, व्यापारी वर्ग आणि मध्यमवर्गीय भागांमध्ये भाजपचा प्रभाव वाढल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत या पेचावर प्राथमिक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती. जागावाटपाचा फॉर्म्युला, स्थानिक राजकीय समीकरणे, मागील निवडणुकांचे निकाल आणि विजयाची शक्यता या बैठकीत यांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.