धुळे महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सत्ता मिळवली आहे. महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या मायादेवी परदेशी यांनी स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादन केला आहे. त्यांच्यासोबत उपमहापौरपदी भाजपाच्याच ज्योत्स्ना पाटील यांची निवड झाली आहे. या विजयासह धुळे महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे.
पीठासन अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत मायादेवी परदेशी यांना तब्बल ५० नगरसेवकांचे समर्थन मिळाले. स्पष्ट बहुमत मिळवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना तसेच एमआयएमच्या उमेदवारांचा पराभव केला.
महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदे गटाच्या संयुक्त उमेदवार गीता तुषार नवले यांना अवघी १३ मते मिळाली, तर एमआयएमच्या उमेदवार हसीना बानो साजिद यांना १० मतांवर समाधान मानावे लागले. याशिवाय एक नगरसेवक तटस्थ राहिला.
महापौरपदासोबतच उपमहापौरपदी भाजपाच्या ज्योत्स्ना पाटील यांचीही बहुमताने निवड झाली. भाजपच्या या दुहेरी विजयामुळे विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला असून, महापालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकली आहेत.
या विजयानंतर भाजपकडून महापालिका निवडणूक विभागाबाहेर जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि एकमेकांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. धुळे शहराच्या विकासाला आता नव्या नेतृत्वाखाली गती मिळेल, अशी अपेक्षा भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.