खासदार संजय राऊत यांचे नरकातला स्वर्ग हे पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवश्य वाचलं पाहिजे यासाठी राऊतांनी त्यांना पत्र पाठवले आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांनीही पुस्तक वाचावे, असे राऊतांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर यावेळी सडकून टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जुलमी राज्यव्यवस्थेचे सूत्रधार म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, "जुलमी राज्यव्यवस्था आपली सत्ता टिकवण्यासाठी, आपल्या समोरचं आव्हान जेव्हा लोकशाही मार्गानं संपवता येत नाही, तेव्हा सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर करून आपल्या विरोधकांना संपवणे. आणि त्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांच राज्य निर्माण करणे. त्याला घाबरून काही लोकं पळून जातात. पण काही लोकं त्याला स्वीकारत नाही. त्यातूनच नरकातला स्वर्ग हे पुस्तक निर्माण झालं. हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांनी वाचावं, त्यांनी यंत्रणांचा गैरवापर केला, यासाठी त्यांनी हे पुस्तक वाचावं. या जुलमी राज्य व्यवस्थेचे ते सूत्रधार आहेत."
राज्यात सुरू असलेल्या महिलांच्या अत्याचार, अन्यायासंबंधीत राज्य महिला आयोगाची भूमिका यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. यावेळी राऊत म्हणाले की, "महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणि प्रमुखपदी अराजकीय व्यक्ती असायला हवा. राजकारणातील सोय म्हणून जर कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे या पदावर राजकीय व्यक्तीच आहेत. राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास मंडळ नाही, हे घटनात्मक पद आहे."