पुण्यातील भोर एसटी बस आगारात पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत. मात्र त्याच्या लोकार्पणावरून भाजप आणि राष्ट्रवादीत चढाओढ असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेते संक्राम थोपटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी एकाच एसटी बसचे दोन वेगवेगळ्या वेळी लोकार्पण केल्याने हा वाद चव्हाट्यावर आला आहे. यामुळे पुण्यातील राजकारण तापले असून महायुतीतील धुसपूस हा समोर आली आहे. दरम्यान, दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आपापल्या नेत्याला श्रेय देत आहेत.
दोन दिवसांपूर्वी गुरुवारी सकाळी 9 वाजता लोकार्पणाची नियोजित वेळ होती. मात्र संग्राम थोपटे यांनी त्याआधीच सकाळी 8 वाजता लोकार्पण उरकले. त्यामुळे मांडेकर यांना नियोजित वेळेनुसार दुसरे लोकार्पण करावे लागले. मांडेकर यांनी थोपटे यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त करत म्हटले की, "महायुती म्हणून एकत्र काम करताना विद्यमान पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत उद्घाटन व्हायला हवे होते. भोर एसटी बस आगाराला बस मिळवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि याचा पुरावा त्यांच्याकडे आहे." तर दुसरीकडे, थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी बस मिळवण्याचे श्रेय आपल्या नेत्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले आहे.
लोकार्पण नाट्यामुळे दोन्ही पक्षातील मतभेद आता उघड झाले आहेत. याबाबत मांडेकर म्हणाले की, "आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटते की, दोन्ही पवारांनी (शरद पवार आणि अजित पवार) एकत्र यावे. त्यांचा जो निर्णय असेल, तो आमचा असेल."
हेही वाचा