विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. सांगलीत भाजपचे नेते सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करण्यात आली आहे. पंढरपूर रोडवरील राम मंदिराजवळ खाडे यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शेत जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. सुधाकर खाडे यांच्यावर वार झाल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा पंचनामा करत पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मात्र काही दिवसांपूर्वी खाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.