ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र, "...हे यश केवळ कार्यकर्त्यांचं आहे"

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक भावनिक पत्र लिहून कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Published by : Team Lokshahi

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक भावनिक पत्र लिहून कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. हे पत्र त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करत आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. पक्षातील सर्व सहकाऱ्यांची, ज्येष्ठ नेत्यांची आणि राज्यातील जनतेची त्यांनी विशेषतः कृतज्ञतेने आठवण केली आहे. पत्रात ते लिहतात “35 वर्षांपूर्वी मी राजकीय पार्श्वभूमी नसताना एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. भिंती रंगवणं, पत्रकं वाटणं, गावोगाव सायकलवर फिरणं, पक्षाचा विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हेच माझं काम होतं. आज त्या प्रवासातून मी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत आलो, हे माझ्यासाठी आजही अविश्वसनीय वाटतं.”

12 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी आनंदाबरोबरच ही जबाबदारी पेलण्याचं दडपणही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “या पदावर उत्तमरावजी पाटील, गोपीनाथ मुंडे, ना. गडकरी, देवेंद्र फडणवीस, फुंडकर, मुंगंटीवार यांसारख्या दिग्गजांनी काम केलं आहे. त्यामुळे हे पद माझ्यासाठी शिवधनुष्य होतं. मात्र सर्व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे ते समर्थपणे पेलता आलं,” असे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास करून बूथस्तरापासून ते नेतृत्वापर्यंत समन्वय साधत पक्ष संघटन बळकट केलं. यामध्ये दीड कोटी सदस्यसंख्या गाठून भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला, हे त्यांनी अभिमानाने नमूद केले.

“या कार्यकाळात दोन निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही, परंतु त्यातून शिकत विधानसभेत यश मिळवलं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप- महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आलं, हे यश केवळ कार्यकर्त्यांचं आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. ते पुढे लिहतात , “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळणं, हे माझं भाग्य आहे. त्यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेत मी प्रदेशाध्यक्ष म्हणून योगदान दिलं आणि आता महसूल मंत्री म्हणूनही देण्याची संधी मिळते आहे.”

राष्ट्रीय नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना बावनकुळे म्हणाले, “आदरणीय मोदीजी, अमित शहा, जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि अन्य वरिष्ठांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी ऋणी आहे. त्यांच्या अपेक्षांचं ओझं अध्यक्षपदाच्या माध्यमातून पार पाडण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला.”

“या संपूर्ण प्रवासात कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जी साथ दिली त्याशिवाय मी हे काही करू शकलो नसतो. महाराष्ट्रातील जनतेने सर्वत्र भरभरून प्रेम दिलं, हीच माझी मोठी संपत्ती आहे,” असे भावनिक उद्गारही त्यांनी व्यक्त केले. अंतिमतः, “राष्ट्रप्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः हे ब्रीद अंगीकारून मी कायम प्रामाणिक राहिलो आहे. मी कार्यकर्ता होतो आणि कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत राहीन. अध्यक्ष म्हणून काम करत असताना अनवधानाने कुणाला दुखावलं गेलं असेल, चुकलो असेन तर मी मनापासून माफी मागतो,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dalai Lama : दलाई लामांच्या उत्तराधिकारीविषयी भारताचा ठाम निर्णय, चीनच्या हस्तक्षेपाला विरोध

Diogo Jota Dies : क्रीडा विश्वावर शोककळा! लिव्हरपूल आणि पोर्तुगाल संघातील 'या' खेळाडूचे अपघाती निधन

Vijayi Melava : ठरलं तर! स्थळ, वेळ, वार जाहीर; 'आवाज ठाकरेंचा...', म्हणत आमंत्रण पत्रिका शेअर

Rahul Gandhi On Government : 3 महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी संपवले आयुष्य; राहुल गांधींचा सरकारवर घणाघात