भाजपचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येणार असल्याच दिसून येत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे देणार असल्याचं मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. वैयक्तिक वादावर टीका करतात त्या संदर्भात धसांना समज द्यावी अशी विनंती पंकजा मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींना केली आहे. तर दुसरीकडे सुरेश धस यांनी देखील राष्ट्रीय स्थरावर पंकजा मुंडे यांची तक्रार करणार असल्याचं म्हणत आहेत.
याचपार्श्वभूमिवर पंकजा मुंडे म्हणाल्या की, "माझ्या पक्षातील श्रेष्ठींसोबत म्हणजेच मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि आमच्या संघटनातील जे श्रेष्ठी आहेत त्यांच्यासोबत मी चर्चा केलेली आहे. ज्या विषयामध्ये कोणताही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करण, किंवा कोणतीही टिप्पणी वैयक्तिक पद्धतीने त्यांनी माझ्यावर टीका करण हे अपेक्षित नाही. त्यांनी ते करु नये, पक्षाच्या अंतर्गत ठेच पोहचू नये म्हणून मी गेले चार-पाच महिने नागपूर अधिवेशन ते आतापर्यंत गप्प बसले. पण आता मी पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली आहे की, त्यांनी धस यांना समज द्यावी", असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
तसेच पुढे सुरेश धस यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस म्हणाले की, "राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे मी लेखी तक्रार करणार आहे. मला समज देण्याच काय कारण? मी काय भाजपचा उमेदवार सोडून दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला नाही. त्यांनी भाजपचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केला आहे. शिट्टी या चिन्हाचा प्रचार केला आहे. मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा", असं मत असल्याच सुरेश धस म्हणाले आहेत.