डोंबिवलीत भाजप आक्रमक झाली असून कॉंग्रेसचे नेते प्रकाश उर्फ मामा पगारे' यांना भर रस्त्यात साडी नेसवून भाजप पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मॉर्फ करून साडीमध्ये दाखवले आणि त्याचसोबत पगारे यांनी समाज माध्यमांत प्रसारित केली होती. या प्रतिमेच्या सोबत 'मी कशाला आरशात पाहू गं, मीच माझ्या रूपाची राणी गं, मी कशाला बंधनात राहू गं', हे गाणे सामायिक केले होते. भाजप कार्यकर्ते संतापले होते.
काँग्रेस नेत्याने केलेल्या कृत्याचा भाजप स्टाईलमध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी, डोंबिवलीत काँग्रेसचे नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात साडी नेसवली. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, दत्ता माळेकर, करण जाधव, संदीप माळी यांनी पगारे यांना मानपाडा रस्त्यावर गाठले आणि त्यांना साडी नेसवली.
भाजपने केलेल्या विरोधानंतर डोंबिवली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मॉर्फ करून व्हायरल केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. पुन्हा असे कृत्य केल्यास भाजपची स्टाईल दाखवू, असा भाजप कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे. भर रस्त्यातील या घटनेमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.