ताज्या बातम्या

BMC Election 2026 : मुंबई महापौरपदावर भाजप ठाम; महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने आता मुंबईचा महापौर बसवण्याचा मुहूर्त निश्चित केल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

Edited by : Varsha Bhasmare

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने आता मुंबईचा महापौर बसवण्याचा मुहूर्त निश्चित केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे.

भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन मंगळवारी पदभार स्वीकारणार असून, त्यानिमित्ताने मुंबई व महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप नेतृत्वाकडून मुंबई महापौरपदाबाबत अंतिम निर्णय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११४ जागांचा आकडा गाठण्यासाठी भाजपला शिंदे गटाच्या शिवसेनेच्या २९ नगरसेवकांचे पाठबळ आवश्यक आहे. मात्र, ही गरज ओळखून शिंदे गटाकडून महापौरपदावर दावा आणि दबावतंत्र वापरले जात असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद तसेच स्थायी व बेस्ट समितीत योग्य वाटा मागितल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने या दबावाला बळी न पडण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

“मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपने अनेक वर्षे प्रतीक्षा केली आहे. त्यामुळे यंदा कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मित्रपक्षांना देण्यात आला आहे. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. गट स्थापना आणि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिंदेसेना आणि भाजपची बैठक दिल्लीत होणार असून, ती प्रामुख्याने गट स्थापनेसंदर्भात असेल. “कुठल्याही पदासाठी तडजोड करण्याचा प्रश्नच नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. दरम्यान, महायुतीच्या विजयी नगरसेवकांची कोकण भवन येथे संयुक्त नोंदणी होणार असून, यावेळी महायुतीचे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. महापौरपदावर भाजपचाच दावा कायम राहणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा