आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या शिखरावरून सुरू असलेल्या वादाने सोमवारी चांगलाच उग्र स्वरूप धारण केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज तुळजाभवानी मंदिराला भेट दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या गाडीला अडवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
अलीकडे तुळजाभवानी मंदिराच्या शिखर आणि गाभाऱ्याच्या दुरुस्ती-विकासाबाबत चर्चा सुरू आहे. या कामांच्या अनुषंगाने मंदिराच्या ऐतिहासिक भागांना हात लावला जाणार असल्याची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट भूमिका घेतली की, “कोणत्याही परिस्थितीत तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी चढलेल्या पायऱ्यांना हात लावू देणार नाही.”
आव्हाडांची स्पष्ट भूमिका
तुळजापूर भेटीदरम्यान मंदिराची पाहणी करून आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “मंदिराच्या विकासाला आम्ही विरोध करत नाही. परंतु, ऐतिहासिक संदर्भ असलेल्या वास्तूंना हलवण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही ठामपणे विरोध करू. गाभाऱ्याला व पायऱ्यांना हात लावू देणार नाही.”
भाजप कार्यकर्त्यांचा आक्रमक मोर्चा
आव्हाड यांच्या या वक्तव्यांनंतर संतप्त भाजप कार्यकर्ते मंदिराबाहेर जमले. त्यांनी ‘हिंदू धर्माचा आणि देवीचा अवमान’ केल्याचा आरोप करत घोषणाबाजी सुरू केली. आव्हाडांची गाडी मंदिराबाहेर थांबवून आंदोलन करण्यात आले. या दरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.