भाजपने मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या 71 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. मात्र, मोठा धक्का देत भाजपने पाटणा साहिब मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष नंद किशोर यादव यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी रत्नेश कुशवाहा यांना तिकीट देण्यात आले आहे.
नंद किशोर यादव 2010 पासून पाटणा साहिबचे प्रतिनिधित्व करत होते. याशिवाय राम कृपाल यादव (दानापूर), प्रेम कुमार (गया), माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद (कटिहार), आलोक रंजन झा (सहरसा), मंगल पांडे (सिवान) यांचाही यादीत समावेश आहे. हिसुआ मतदारसंघातून अनिल कुमार यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.
या यादीच्या काही तास आधी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सोशल मीडियावरून एनडीएतील जागावाटपाचा तिढा सुटल्याचे जाहीर केले होते. बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत –6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार असून, मतमोजणी 14 नोव्हेंबरला होईल.