(BMC Election Date) राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे मुंबईत निवडणुकीची तयारी सुरू झाली असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पालिकेच्या निवडणुका कधी जाहीर होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ही घोषणा कधीही होऊ शकते, याचा अंदाज घेऊन राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आधीपासूनच तयारीला लागले होते. शिंदे गटाची शिवसेना, ठाकरे गटाची शिवसेना आणि भाजप – या तिन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच, असा निर्धार या पक्षांनी केला आहे. अखेर निवडणूक आयोगाने आज तारीख जाहीर केली आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे, तर मतमोजणी आणि निकाल 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर केला जाईल.
मुंबईतील मतदारांची माहिती
या निवडणुकीत मतदारांना एकच मत द्यायचे आहे. मुंबईत एकूण 10,111 मतदान केंद्रे असतील. यामध्ये सुमारे 11 लाख दुबार नोंद असलेले मतदार आढळले आहेत. अशा मतदारांना नेमके कोणत्या केंद्रावर मतदान करणार, याची माहिती द्यावी लागेल. त्यांच्या नावासमोर मतदार यादीत डबल स्टार चिन्ह दिलेले असेल.
निवडणूक आयोगाने दिलेली सविस्तर माहिती
15 डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार
मतदान: 15 जानेवारी 2026
मतमोजणी व निकाल: 16 जानेवारी 2026
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत: 23 ते 30 डिसेंबर 2025
अर्ज तपासणी: 31 डिसेंबर 2025
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 2 जानेवारी 2026
मुंबईत राजकीय लढत रंगणार
मुंबई महापालिकेत एकूण 227 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सर्व जागा जिंकण्यासाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.