BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ही सुट्टी मुंबईतील सर्व सरकारी कार्यालये, बँका, खासगी कंपन्या, दुकाने, मॉल्स, कारखाने आणि आयटी कंपन्यांना लागू असेल. विशेष म्हणजे, मुंबईचे मतदार असलेले पण ठाणे, नवी मुंबई किंवा पालघर येथे काम करणारे कर्मचारी देखील या सुट्टीचा लाभ घेऊ शकणार आहेत.
ज्या ठिकाणी पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नाही, अशा आवश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान काही तास मतदानासाठी मोकळीक देणे बंधनकारक आहे. जर कोणत्याही आस्थापनेने सुट्टी किंवा सवलत नाकारली, तर नागरिक तक्रार नोंदवू शकतात. लोकशाहीच्या या प्रक्रियेत कुणीही मतदानापासून वंचित राहू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.