(BMC Election) राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेगात सुरू आहे. लवकरच महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीने उद्धव ठाकरेंच्या ताब्यातून मुंबई महापालिका मिळवण्याची मोहीम सुरू केली असून तीनही पक्षांमध्ये तयारी सुरू आहे. भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र लढण्याचे संकेत जवळपास स्पष्ट झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांचे जागावाटप कसे असू शकते याबाबतची माहिती पुढे आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई महापालिकेसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर काही प्राथमिक आकडे समोर आले. त्यानुसार:
भाजप सुमारे 130 ते 140 जागा लढण्याच्या विचारात
शिवसेना (शिंदे गट) ला 80 ते 90 जागा
राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला मुस्लिम बहुल भागातील 10 ते 15 जागांची अपेक्षा
अधिकृत घोषणा मात्र अद्याप झालेली नाही.
बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष नेत्यांची चर्चा झाली. आगामी महापालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यात आली. जानेवारीत 29 महापालिकांची निवडणूक होण्याची शक्यता असून युतीचा अंतिम फॉर्म्युला लवकरच जाहीर केला जाईल.
चव्हाण यांनी पुढे सांगितले की शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महायुती एकत्रितपणे सर्व महापालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढणार हे निश्चित झाले आहे. आता या युतीला थोपवण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर उभे राहणार आहे.