यंदाच्या अवकाळी पावसामुळे आणि तब्बल 12 दिवस लवकर येऊन धडकलेल्या मान्सूनमुळे मुंबईकरांची झालेली त्रेधातिरपीट पाहायला मिळाली. एकीकडे ठिकठिकाणी पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे झालेली वाहतूककोंडी तर दुसरीकडे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचून विस्कळीत झालेली रेल्वे वाहतुक यामुळे मुंबईकर पुरते वैतागले.
याच पार्श्वभुमीवर यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि रस्ते आणि रेल्वे वाहतुक पावसाळ्यामध्ये ही सुरळीत चालू राहावी. यासाठी महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी पावसाचे पाणी साचणाऱ्या संभाव्य ठिकाणी भेट देत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हिंदमाता, गांधी मार्केट आणि इतर सखल भागात यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे पाणी साचू नये, यासाठी आवश्यक ठोस उपाययोजना करण्याबाबत आणि पंप चालू ठेवण्याबाबत अधिकची काळजी घ्या, असे निर्देश भुषण गगराणी यांनी प्रशासनाला दिले आहेत.
आयुक्त गगराणी यांनी शीव (सायन) येथील जैन सोसायटी मार्ग, दादर येथील परळचा राजा मार्ग या सिमेंट काँक्रिट रस्ते कामांचीदेखील पाहणी केली. परळ येथील एफ/दक्षिण विभाग कार्यालयातील आढावा बैठकीनंतर गगराणी यांनी नागरी सुविधा केंद्रास भेट दिली. तसेच, नागरिकांशी संवाद साधला. यावेळी, उप आयुक्त (परिमंडळ 5) देविदास क्षीरसागर, एल विभागाचे साहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर, एफ/दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त महेश पाटील, एफ/उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त अरुण क्षीरसागर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले.
महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी दिलेले आदेश
१) यंदा पावसाळ्यात, सखल भागातील पावसाचे साचणारे पाणी उपसणारी यंत्रणा अधिक प्रभावी करावी
२) हिंदमाता, गांधी मार्केट येथील उदंचन केंद्रांची क्षमता अधिक परिणामकारक पद्धतीने कार्यरत ठेवावी.
३) उदंचन केंद्राचे परिचलन अधिक सक्षम व्हावे, यासाठी काळजी घ्यावी.
४) चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचू नये आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये, याची दक्षता बाळगावी,
५) पाणी साचत असलेल्या ठिकाणी ‘फ्लो मीटर’ बसवावेत. सर्व पंपांची क्षमता एकसमान करावी.
६) आपत्कालीन समयी अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे,
७)उदंचन संच बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनित्र (जनरेटर) संच तातडीने उपलब्ध करून द्यावेत
८)उदंचन केंद्र परिचालकांनी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागशी संपर्क साधून पावसाचा नियमितपण अंदाज घ्यावा.
९)पावसाच्यावेळी उदंचन केंद्र यंत्रणा पुरेशा क्षमतेने आणि वेळेत कार्यान्वित करावे.
१०)चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळील नाल्यांची व्यवस्थित स्वच्छता करावी. उदंचन संच बंद पडला तर पर्याय म्हणून दुसरा संच तातडीने तैनात ठेवावा.
११)अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सतर्क आणि तत्पर राहावे
हिंदमाता येथे 26 मे रोजी जोरदार पाऊस पडल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होते. चुनाभट्टी, कुर्ला, मस्जिद बंदर, परळ आदी ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे वाहतुक कोंडी झाली होती त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा उदभवू नये तसेच चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचू नये आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी आयुक्त गगराणी यांनी दिले.