Board Exam 2026 : दहावी–बारावीच्या परीक्षा जवळ आल्या की विद्यार्थ्यांसोबतच पालकांचाही ताण वाढतो. अभ्यास, आहार, वेळेचे नियोजन याकडे लक्ष देताना पालकांची महत्त्वाची भूमिका असते. योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक वातावरण दिल्यास मुलांना परीक्षेत नक्कीच यश मिळू शकते. चला तर जाणून घेऊया, पालकांनी मुलांना कोणत्या गोष्टी शिकवाव्यात.
मुलांशी संवाद ठेवा
परीक्षेच्या काळात मुलांच्या मनात भीती, गोंधळ असतो. त्यांच्याशी शांतपणे बोला. कोणता विषय अवघड वाटतो, काय अडचण येते हे समजून घ्या. ऐकून घेतल्याने मुलांचा ताण कमी होतो.
अभ्यासात साथ द्या
फक्त “अभ्यास कर” एवढेच सांगू नका. शक्य असेल तेवढी मदत करा. प्रश्न सोडवताना किंवा उजळणी करताना पालक जवळ असतील तर मुलांना आत्मविश्वास मिळतो.
सोपे वेळापत्रक बनवा
सर्व विषयांचा विचार करून रोजचा अभ्यास ठरवा. जास्त तास नाही, पण नियमित अभ्यास ठेवा. यामुळे अभ्यासाचा भार वाटत नाही.
कठीण विषय आधी घ्या
जे विषय समजायला अवघड आहेत त्यासाठी जास्त वेळ द्या. सुरुवातीलाच ते पूर्ण केल्यास शेवटच्या काळात घाई होत नाही.
सरावाला महत्त्व द्या
जुने प्रश्नपत्रिके सोडवायला सांगा. त्यामुळे परीक्षेचा अंदाज येतो आणि उत्तर लिहिण्याचा सराव होतो.
आत्मविश्वास वाढवा
गुणांपेक्षा प्रयत्नांचे कौतुक करा. “तू करू शकतोस” हे शब्द मुलांसाठी खूप महत्त्वाचे असतात. सकारात्मक वातावरण ठेवल्यास मुलं निर्धास्तपणे परीक्षा देतील.
योग्य मार्गदर्शन, प्रेम आणि समजूतदारपणा असेल तर परीक्षेचा काळ मुलांसाठी सोपा आणि यशस्वी होऊ शकतो.