बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. “काटा लगा” या रीमिक्स गाण्यातून घराघरात पोहोचलेल्या शेफालीचं वयाच्या 42व्या वर्षी निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, तिचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता ही घटना केवळ हार्ट अटॅकपुरती मर्यादित नसल्याचे संकेत पोलिस तपासातून समोर येत आहेत.
शुक्रवारच्या मध्यरात्री, सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिस आणि फॉरेन्सिक टीम शेफालीच्या अंधेरी येथील घरी पोहोचली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच तपास सुरू करण्यात आला. यावेळी घरात उपस्थित असलेल्या कुटुंबीयांशी आणि कर्मचाऱ्यांशी चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे शेफाली यांच्या कुक आणि मेड यांना तात्काळ अंबोली पोलीस ठाण्यात नेऊन विचारपूस करण्यात आली आहे.
शेफाली यांना अचानक प्रकृती खालावल्याने तिचा पती पराग त्यागीने शेफालीला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तरीही आता तिच्या मृत्यूमागचं कारण हार्ट अटॅकच आहे की काही वेगळं, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी कूपर रुग्णालयात पाठवला असून, अंतिम रिपोर्ट आल्यानंतरच नेमकं कारण समोर येणार आहे.
शेफाली जरीवालाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2000च्या दशकात "काटा लगा" या म्युझिक व्हिडिओमधून केली. त्यानंतर ती काही हिंदी चित्रपटांमध्ये झळकली. तसेच 'बिग बॉस 13' आणि 'नच बलिए' यांसारख्या रिअॅलिटी शोजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं आहे.
सध्या पोलिस आणि फॉरेन्सिक टीम मिळालेल्या पुराव्याच्या आधारे चौकशी करत आहेत. शेफालीच्या मृत्यूमागे काही संशयास्पद बाबी आहेत का? हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, तिच्या कुटुंबीयांना हा मोठा धक्का असून संपूर्ण इंडस्ट्री त्यांच्या अचानक जाण्याने शोकमग्न आहे.