1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल. तर आजपासून म्हणजेच 31 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लोकसभेपुढे आर्थिक पाहणी अहवाल ठेवतील.
या पाहणी अहवालामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवण्यात येतात. तसेच हा अहवाल केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी दाखवला जातो. अधिवेशनाच्या आधी गुरुवारी केंद्रीय संरक्षणमंत्री व लोकसभेचे उपनेते राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये 36 पक्षांचे 52 नेते सहभागी झाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनचा पहिला टप्पा कधीपर्यंत
अर्थसंकल्पीय अधिवेशनचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा टप्पा पार पाडला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्या टप्प्यात महागाई, बेरोजगारी तसेच आर्थिक मुद्द्यांवर विरोधकांकडून मांडणी केली जाते.
या व्यतिरिक्त नुकतीच झालेली प्रयागराजमधील महाकुंभ सोहळ्यातील चेंगराचेंगरी आणि त्यामध्ये समजलेली मृतांची तसेच जखमींची संख्या या विषयावर देखील विरोधकांकडून आक्रमक मुद्दे मांडले जातील. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि वक्फ विधेयक प्रश्नावरही विरोधकांकडून केंद्र सरकार प्रश्नांची कोंडी केली जाऊ शकते.