मुंबईहून अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन तासांत पार करणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई आणि अहमदाबाददरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार असून व्यापार, उद्योग, गुंतवणूक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. मात्र, या प्रकल्पाच्या कामाला सध्या काही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पूर्व’ विभागाने प्रकल्पाला काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. आवश्यक पर्यावरणीय उपाययोजना वेळेत राबवण्यात आल्या नसल्याचा आरोप पालिकेने केला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मुंबईतील काही भागांतील कामांना तात्पुरता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या वेळापत्रकावर परिणाम होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या सर्व अडचणींमध्येही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. भारताची पहिली बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून अहमदाबादपर्यंतचा प्रवास केवळ २ तास ७ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या सोयीसाठी दर ३० मिनिटांनी बुलेट ट्रेन उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक टप्पा म्हणजे बीकेसी (वांद्रे-कुर्ला संकुल) ते शिळफाटा दरम्यानचा बोगदा. सुमारे २१ किलोमीटर लांबीचा हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केला जात आहे. यातील ५ किलोमीटर लांबीचा बोगदा शिळफाटा ते घणसोली दरम्यान न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (NATM) वापरून बांधला जात आहे. उर्वरित १६ किलोमीटर लांबीचा बोगदा टनेल बोरिंग मशीन (TBM) द्वारे तयार करण्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे या बोगद्यामध्ये ठाणे खाडीखालील सुमारे ७ किलोमीटर लांबीचा भाग समाविष्ट आहे. समुद्राखाली बोगदा बांधण्याचे हे भारतातील एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प राबवला जात असून, सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. एकीकडे पर्यावरणीय नियमांबाबत प्रश्न उपस्थित होत असले, तरी दुसरीकडे केंद्र सरकार प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ठाम असल्याचे चित्र आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारताच्या वाहतूक क्षेत्रात एक नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.