भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. सकाळी 10 वाजता पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी नवी दिल्लीतील राजकीय वातावरण सज्ज झाल्याचे पाहायला मिळाले. अलीकडेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करत 15 वे उपराष्ट्रपतीपद स्विकारले आहे.
या निवडणुकीत राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. एनडीएच्या खात्रीशीर मतांबरोबरच वायएसआरसीपीच्या खासदारांनी देखील त्यांना समर्थन दिले. त्यामुळे काही विरोधी खासदारांनी क्रॉस-व्होटिंग केल्याची चर्चा रंगली होती. दुसरीकडे, बीजेडी, बीआरएस, एसएडी आणि एका अपक्ष खासदारासह 13 जणांनी मतदानात भाग घेतला नाही.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर ही निवडणूक घेणे आवश्यक ठरले होते. उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.
शपथविधी कार्यक्रमासाठी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल नवी दिल्लीला दाखल झाले होते. त्यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मजही, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तसेच कर्नाटक, पंजाब, झारखंड आणि मध्यप्रदेशातील राज्यपाल व मुख्यमंत्री यांचा समावेश होता. तिरुप्पूर, तामिळनाडू येथे जन्मलेले राधाकृष्णन यांनी संघ कार्यकर्त्यापासून सुरुवात करून भाजपाच्या संघटनात्मक आणि संसदीय राजकारणात आपला ठसा उमटवला आहे.