छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर शहरातील कचरा संकलन व्यवस्था कोलमडलेली असून नागरिकांना साचलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ‘कॅग’ (महा लेखापरीक्षक) च्या 2024 मधील अहवालात यावर ठळकपणे प्रकाश टाकत मनपा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, शहरात उघड्यावर कचरा संकलन होत असून सुरक्षा उपकरणांचा वापर न करता काम केले जात आहे.शहरातील कचरा संकलनाचे काम पी. गोपीनाथ रेड्डी यांच्या कंपनीकडे सोपवले असून दररोज सुमारे 450 ते 500 टन कचरा संकलित केला जातो. मनपाकडून कंपनीला 2244.18 रुपये प्रतिटन या दराने मोबदला दिला जातो. यामुळे दर महिन्याला मनपाकडून सुमारे ३ कोटींपेक्षा अधिक रक्कम या कंपनीला दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात शहरभर कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत.
कंपनीकडे 300 वाहने उपलब्ध असली, तरी सद्यस्थितीत किमान ५०० हून अधिक वाहनांची गरज असल्याचे समोर आले आहे. मनपाकडून संपूर्ण कचऱ्याचे वर्गीकरण केल्याचा दावा केला जात असला तरी, तोही हवेतच विरून जात असल्याचे ‘कॅग’ अहवालातून स्पष्ट होते.
त्याचबरोबर हवा आणि पाण्याच्या तपासणीसंदर्भातही मनपाने कोणतीही ठोस पावले न उचलल्याची टीका अहवालात करण्यात आली आहे. मनपा प्रशासनाकडून दिलेल्या माहितीप्रमाणे, शहराचा विस्तार लक्षात घेता घंटागाड्यांची संख्या अपुरी असून लवकरच नव्या गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांची कचऱ्याशी संबंधित समस्या काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मात्र, प्रत्यक्षात नागरिकांच्या तक्रारी यापेक्षा वेगळे वास्तव मांडतात. "गेल्या चार दिवसांपासून आमच्या भागात घंटागाडीच आलेली नाही. गाडी येण्याची वेळ ठरलेली नसल्याने वाट पाहण्यात वेळ जातो," अशी प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी दिली. महापालिकेच्या आणि कंत्राटी कंपनीच्या निष्क्रीयतेमुळे शहरातील कचरा व्यवस्थापन कोलमडले असून, त्याचे गंभीर परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत. ‘कॅग’ चा अहवाल हा मनपासाठी जागे होण्याचा इशारा असून, वेळेत योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.