महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आज सत्ताधारी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा आणि दौऱ्यांमुळे प्रचाराला जोरदार वेग मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज राज्याच्या विविध भागांत जाहीर सभा, रोड शो आणि प्रचार रॅलींच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर उपस्थित राहणार आहेत. येथे संत वामन भाऊ यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथीनिमित्त भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी आमदार धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती असणार आहे. या निमित्ताने राज्यभरातून भाविक आणि अनुयायी मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर, पिंपरी आणि मुंबई येथे जाहीर सभांनाही संबोधित करणार आहेत. सोलापुरात दुपारी होणारी सभा ही आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सभेत मुख्यमंत्री कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार, तसेच स्थानिक राजकारणावर काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी आणि मुंबईतील सभांमधूनही प्रचाराला अधिक धार मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही आज महत्त्वपूर्ण दौरा आहे. ते दुपारी ४ वाजता कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होणार असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोड शो करणार आहेत. याआधी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानात एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा होणार आहे.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज पुण्यात सकाळी १० वाजता प्रचार रॅली सुरू होणार आहे. पुणे शहर आणि परिसरात अजित पवार यांच्या एकूण चार प्रचार सभा आणि मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या दौऱ्यांमुळे महायुतीच्या प्रचाराला अधिक बळ मिळणार असून आगामी महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.