थोडक्यात
रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी मोठं गिफ्ट
रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
(Railway Employees Diwali Bonus) दिवाळी आणि छठपुजेपूर्वी केंद्र सरकारने रेल्वे विभागातील लाखो कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांच्या बोनस मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी गोड होणार आहे.
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 10.91 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एकूण 1,865.68 कोटी रुपयांचा खर्च या बोनससाठी केला जाणार असून, रक्कम दिवाळीपूर्वीच थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. या बोनसचा फायदा ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, स्टेशन मास्टर, गार्ड, सुपरवायझर, टेक्निशियन, हेल्पर, पॉइंट्समन आणि इतर ग्रुप ‘सी’ कर्मचाऱ्यांना होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने याशिवाय आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून, एकूण 94,916 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये बख्तियारपूर–राजगीर–तिलैया रेल्वे लाईन प्रकल्पासाठी 2,192 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
रेल्वे विभागात दरवर्षी दुर्गा पूजा किंवा दशहरा उत्सवापूर्वी उत्पादकतेशी निगडित बोनस (PLB) कर्मचाऱ्यांना दिला जातो. यावर्षीही ही परंपरा कायम ठेवत सरकारने 78 दिवसांच्या बोनस मंजूर केला आहे. हा निर्णय रेल्वेच्या कामगिरीत वाढ करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळणार असून, या निर्णयाचे स्वागत विविध कर्मचारी संघटनांनी केले आहे.