थोडक्यात
सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट
1.2 कोटी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त व्यक्तींना फायदा होणार
महागाई भत्तामध्ये 3 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता
DA Hike : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी येऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच महागाई भत्यात वाढ करण्याचा निर्णय घेणार आहे. ही वाढ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्याचा लाभ सुमारे 1.2 कोटी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त व्यक्तींना होणार आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना 55 टक्के महागाई भत्ता मिळत असून आता त्यामध्ये 3 टक्क्यांची वाढ होऊन, आता तो 58 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. नवीन दर जुलै 2025 पासून लागू होणार असून, ऑक्टोबरच्या पगारात त्याचा फरकही समाविष्ट केला जाऊ शकतो.
दिवाळीपूर्वी मिळणार महागाई भत्त्याचा बोनस?
दरवर्षी सरकार दोनदा डीए (DA) वाढवते. एकदा जानेवारीत आणि दुसरी वेळ जुलै महिन्यामध्ये होते. मागील वर्षी केंद्राने दिवाळीपूर्वीच DA वाढीची घोषणा केली होती.
जर एखाद्याचे मूळ वेतन ₹50,000 असेल, तर सध्याच्या 55% हिशोबाने त्याला ₹27,500 महागाई भत्ता मिळतो.
DA 58% झाला, तर भत्ता वाढून ₹29,000 होईल — म्हणजेच ₹1,500 ची वाढ.
पेन्शनधारकाच्या बाबतीत जर पेन्शन ₹30,000 असेल, तर त्याला सध्या ₹16,500 डीआर मिळतो.
वाढीनंतर ही रक्कम ₹17,400 होईल — म्हणजेच ₹900 चा फरक.
हे डीए वाढीचे सुधारित दर सातव्या वेतन आयोगाअंतर्गत शेवटचे असणार आहेत. कारण या आयोगाचा कार्यकाल 31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त होतो. सरकारने 2025 च्या सुरुवातीला आठव्या वेतन आयोगाची घोषणाही केली होती.