ताज्या बातम्या

Mega Block Cancelled : मुंबईकरांना गणराया पावला! मध्य रेल्वेचा संडे मेगा ब्लॉक रद्द; मुंबई लोकल ट्रेनबाबत मोठी अपडेट

गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना लोकल ट्रेन चुकण्याची चिंता होती, मात्र आता रेल्वे प्रशासनाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

Published by : Prachi Nate

गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना लोकल ट्रेन चुकण्याची चिंता होती, मात्र आता रेल्वे प्रशासनाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. मध्य रेल्वेने रविवारी, 31 ऑगस्ट रोजी मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर नियोजित असलेला मेगा ब्लॉक रद्द केला असून भाविकांच्या सोयीसाठी रात्री विशेष लोकल गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे.

शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, “सर्व गाड्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच धावतील.” हा निर्णय होताच अनेक प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. सणासुदीच्या दिवसांत लोकल हा प्रवासाचा सर्वात जलद व सोयीचा पर्याय असल्याने, रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून बचाव करण्यासही तो उपयुक्त ठरतो. विशेषतः लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी यांसारख्या लोकप्रिय मंडळांकडे रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

याआधी रेल्वेने CSMT ते विद्यानगरीदरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो लाईनवर, तर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक घेण्याचे नियोजन केले होते. या कामांमध्ये देखभाल व अभियांत्रिकी दुरुस्तीचा समावेश होता. मात्र गणेशोत्सवात या वेळापत्रकामुळे भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असता.

याआधीही रक्षाबंधनाच्या दिवशी मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यावेळी प्रवाशांच्या नाराजीचा सूर उमटला होता आणि यावेळीसुद्धा तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती.

रेल्वे प्रशासनाने याबाबत सांगितले की, “देखभाल व सुरक्षिततेसाठी मेगा ब्लॉक आवश्यक आहेत, मात्र सणासुदीच्या काळात प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी विशेष नियोजन केले जात आहे.” गणेशोत्सव लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने रात्री विशेष लोकल गाड्यांची सोय केली आहे. या गाड्या सर्व स्टेशनवर थांबणार असल्याने भाविकांना रात्री उशिरा देखील प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे.

1) रविवारी, 31 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक होणार का?

नाही. मध्य रेल्वेने नियोजित मेगा ब्लॉक रद्द केला आहे. सर्व गाड्या त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार धावतील.

2) मेगा ब्लॉक रद्द का करण्यात आला?

गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर भाविक प्रवास करतात. विशेषतः लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी यांसारख्या मंडळांमध्ये गर्दी होणार असल्याने प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून ब्लॉक रद्द करण्यात आला.

3) भाविकांसाठी कोणती अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे?

मध्य रेल्वेने रात्री विशेष लोकल गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या सर्व स्टेशनवर थांबतील, त्यामुळे रात्री उशिरा देखील प्रवास करणे सोयीचे ठरेल.

4) आधी जाहीर केलेला मेगा ब्लॉक कोणत्या वेळेत होणार होता?

CSMT ते विद्यानगरीदरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 आणि कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्याचे नियोजन होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणानंतर भाजपचा जल्लोष

Sanjay Raut On BJP : “मनोज जरांगेंची कुचेष्टा का केली जाते?” संजय राऊतांचा भाजप नेत्यांवर सवाल

Maharashtra Weather Update : मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा यलो अलर्ट

Pune Ganpati Visarjan News : पुण्यात गणपती विसर्जनाच्यावेळी दुर्दैवी घटना; एका युवकाचा मृत्यू