लालबाग, परळ आणि चिंचपोकळी येथील प्रसिद्ध गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक मुंबई तसेच उपनगरांमधून येतात. भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची व्यवस्था केली आहे.
सीएसएमटी, दादर, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, दिवा, कल्याण आणि पनवेल या महत्त्वाच्या स्थानकांवर विशेष गाड्यांचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांना प्रवास करताना गाड्या ओळखणे सोपे जाईल.
याशिवाय, प्रत्येक स्थानकावरील चौकशी खिडकीवरूनही विशेष गाड्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेशभक्तांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवल्या जात असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.
गणेशोत्सव काळात प्रवासी गर्दी लक्षात घेऊन ही अतिरिक्त सोय केल्याने लालबागच्या राजासह इतर प्रसिद्ध मंडळांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.