रेल्वे स्थानकांवरील गर्दी पाहता केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी एक घोषणा केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेमध्ये रेल्वे प्रवाशांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनेकदा सणाच्या काळामध्ये रेल्वेस्थानकावर गर्दी होताना बघायला मिळते. अनेकदा अधिक गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी होते आणि त्यामध्ये अनेकजण जखमी तसेच मृत्यूमुखीदेखील पडतात. मात्र या सगळ्यावर नियंत्रण यावे यासाठी रेल्वे स्थानकात आता केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार असल्याचे सांगितले.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, "देशभरातील 60 रेल्वे स्थानकांवर कायमस्वरुपीचा वेटींग एरिया असणार आहे. त्यामुळे, केवळ कन्फर्म रिझर्व्हेशन तिकीट असणाऱ्यांनाच येथे प्रवेश दिला जाईल. वेटिंग लीस्ट आणि बिनतिकीट प्रवाशांना बाहेरील प्रतिक्षा क्षेत्र म्हणजेच होल्डिंग एरियातच वाट पाहावी लागेल. अनाधिकृत प्रवेशद्वारांना देखील बंद केला जाईल", असे रेल्वेमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
"त्याचप्रमाणे स्टेशनवरील प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीदेखील लावण्यात येणार आहेत. तसेच नव्या डिझाईनचे 12 मीटर आणि 6 मीटर लांब एफबीओ बनविण्यात येत आहेत. गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्यांची मदत होणार आहे", असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.