गणपती बाप्पाच्या विसर्जनाला काही तासच बाकी आहेत. विसर्जनावरुन येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने एक विशेषसेवा देणार आहेत. मुंबईत चौपाट्यांवर येणाऱ्या भाविकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. अनंत चतुर्दशीसाठी मध्य रेल्वे, हार्बर आणि मुख्य मार्गावर मध्यरात्री विशेष लोकल धावणार आहेत.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी, मुंबईत गणपती विसर्जनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर उतरतात. ही गर्दी उशिरा रात्रीपर्यंत चालत असल्याने नागरिकांना घरी पोहोचण्यासाठी रेल्वेची सुविधा मोठा आधार ठरते. ही गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदाही प्रवाशांसाठी विशेष लोकल गाड्यांची सोय केली आहे.
हार्बर मार्गावर विशेष सेवा – CSMT ते पनवेल आणि परत
6 सप्टेंबरच्या मध्यरात्री (शनिवार ते रविवारची रात्र) हार्बर मार्गावर विशेष लोकल्स धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि पनवेल दरम्यानच्या मार्गावर एकूण चार गाड्या धावतील:
CSMT → पनवेल
पहिली लोकल : रात्री 1.30 वा. CSMT येथून सुटून पहाटे 2.50 वा. पनवेलला पोहोचेल
दुसरी लोकल : पहाटे 2.45 वा. CSMT येथून सुटून सकाळी 4.05 वा. पनवेलला पोहोचेल
पनवेल → CSMT
पहिली लोकल : रात्री 1.00 वा. पनवेलहून सुटून 2.20 वा. CSMT येथे पोहोचेल
दुसरी लोकल : रात्री 1.45 वा. पनवेलहून सुटून 3.05 वा. CSMT येथे पोहोचेल
मुख्य मार्गावरही मध्यरात्री गाड्या धावणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि ठाणे या मुख्य मार्गांवरही, 4 ते 7 सप्टेंबरदरम्यान, मध्यरात्री विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. ही माहिती मध्य रेल्वेने यापूर्वीच प्रसिद्ध केली होती.
ठाणे-वाशी (ट्रान्स-हार्बर मार्ग)
या मार्गावर अद्याप कोणतीही विशेष घोषणा करण्यात आलेली नाही.
रेल्वे प्रशासनाचा प्रवाशांना सल्ला
रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, विसर्जनाच्या दिवशी रस्त्यांवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी या विशेष लोकल्सचा लाभ घ्यावा. रात्रीचा प्रवास अधिक आरामदायक आणि सुरक्षित ठरावा यासाठी या गाड्या नियोजित केल्या आहेत.