मध्य रेल्वेने एटीएम ऑन व्हील्स हा आगळावेगळा प्रकल्प योजला आहे. या माध्यमातून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना रेल्वेच्या आतच एटीएमची सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली असून मध्य रेल्वेने मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेसवर बँक ऑफ महाराष्ट्रचे पहिले एटीएम बसवले. हे एटीएम ट्रेनच्या वातानुकूलित कोचमध्ये बसवण्यात आले असून त्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या मशीनद्वारे प्रवाशांना ट्रेन चालू असतानाही पैसे काढता येणार आहेत.
हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या भुसावळ विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातील सहकार्याने राबवण्यात आला आहे. इगतपुरी आणि कसारादरम्यानच्या मार्गावर बोगद्यांमुळे काही क्षणांसाठी नेटवर्क समस्या उद्भवली होती. त्यामुळे एटीएम वापरात अडचण निर्माण झाली. मात्र काही वेळाने ही यंत्रणा सुरळीत सुरू झाली. भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे म्हणाले, "परिणाम चांगले आले. लोक आता प्रवास करताना पैसे काढू शकतील. आम्ही मशीनच्या कामगिरीवर लक्ष ठेवू."