सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करायला एका महिन्याने केंद्रीय पथक सोलापुरात दाखल झालं आहे. पण त्यांना पाहणीचा मुहूर्त रात्रीचा सापडला आहे. या पथकाने रात्रीच्या अंधारात, टॉर्चच्या मदतीने पुरामुळे झालेल्या नुकसान पाहणीचा दिखावा केला आहे.
सोलापुरातील मोहोळ तालुक्यात केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी पाहणी केली. मोहोळ तालुक्यातील कोळेगाव या ठिकाणी केंद्रीय पथक रात्रीच्या अंधारात दाखल झालं. सीना नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याची जबाबदारी या पथकावर होती.
केंद्रीय ग्राम विकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करन सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल, आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग हे चार सदस्यीय केंद्राचे पथक मोहोळमध्ये रात्रीच्या अंधारात दाखल झालं. यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशीही संवाद साधला.