राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे. विशेषतः शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संभाव्य युती ही चर्चा चांगलीच रंगली आहे. अलीकडेच त्रिभाषा सूत्रावरून सरकारविरोधातील कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकाच मंचावर दिसल्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठे विधान करत राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.
खैरे यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र आल्यास मुंबई महापालिकेतील सत्ता परत मिळवणे शक्य आहे. त्यांनी दावा करत म्हटले, “दोन्ही भाऊ एकत्र आले तरच मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते. याबाबत कोणतेही वाद नाहीत. कारण मुंबई ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच मुंबई वाचली. अन्यथा अनेकांनी मुंबई ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता.”
खैरे यांनी पुढे आरोप केला की केंद्र सरकार आणि यापूर्वीचे काँग्रेस सरकार दोघांचाही मुंबईवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न राहिला आहे. मात्र मराठी माणूस अद्यापही मराठी नेतृत्वाकडेच पाहतो, असे त्यांनी म्हटले. युतीच्या चर्चेबाबत बोलताना खैरे म्हणाले की, निवडणूक जिंकायची असेल तर काही ठिकाणी तडजोड करावीच लागते. “सध्याचा काळ कठीण आहे. आमच्या पक्षाचा डाऊनफॉल असला तरी एकत्र येऊन लढले नाही तर भाजप पुन्हा डोक्यावर बसेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. “काँग्रेसने अजूनही युतीचा निर्णय घेतलेला नाही. ते स्वतंत्र लढले तर मजबूत होतील असे वाटत असेल, पण बिहारमध्ये त्यांनी किती जागा लढल्या आणि किती जिंकल्या? एकच जागा मिळाली. राहुल गांधी यांनी मतचोरीचे आरोप केले तरी त्याचा काही परिणाम झाला नाही,” असे खैरे म्हणाले. खैरे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती प्रत्यक्षात होणार का याबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे. उद्धव–राज एकत्र येणार का, आणि त्याचा मुंबई महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.