राज्यात शाळांमध्ये तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदी शिकवण्यावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. काही राजकीय पक्ष आणि स्थानिक संघटनांनी याला विरोध करत "हिंदी शिकवू देणार नाही", "पाट्या फोडू", अशा घोषणा दिल्याने वातावरण तापले आहे. यावर शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, "राज्यात कुठेही हिंदी शिकवण्याची सक्ती करण्यात आलेली नाही. कोणालाही बळजबरीने हिंदी शिकवलं जाणार नाही." त्यांनी सांगितलं की, “प्रत्येक विषयाचं राजकारण करणं गरजेचं नाही. तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा आग्रह सरकारचा नाही. ज्यांना शिकायचं आहे त्यांनी शिकावं.”
पुढे बोलताना त्यांनी लोकशाहीचे भान ठेवण्याचे आवाहन केले. "लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा आणि भाषेचा अधिकार आहे. कोणीही शिकण्यास इच्छुक असल्यास त्यांना अडवू नये," असं मत त्यांनी व्यक्त केलं. "शिकवू देणार नाही, पाट्या फोडू" अशा प्रकारचा विरोध हा अयोग्य आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. कोणताही विषय बळजबरीने लादलेला नाही आणि याविषयी गैरसमज पसरवले जाऊ नयेत, असं आवाहनही त्यांनी केलं.
सध्या या विषयावरून राजकीय वातावरण तापले असले तरी शिक्षण विभागाने दिलेलं हे स्पष्टीकरण काही प्रमाणात शांतता निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा