Chandrapur Team Lokshahi
ताज्या बातम्या

चंद्रपुरात वाघाची शिकार प्रकरणी 16 संशयित ताब्यात

शिकंजे, शस्त्रे, वाघनख व रोख रक्कम जप्त,आसामच्या शिकार प्रकरणातून लागला शोध

Published by : Sagar Pradhan

अनिल ठाकरे | चंद्रपूर : वाघाच्या शिकार प्रकरणातील आंतराज्यीय टोळीत सहभागी असलेल्या 16 जणांना वनविभागाने गडचिरोलीजवळील आंबेशिवणी येथून त्याब्यात घेतले आहे. यात पुरुष, महिला व लहान मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 6 नग शिकंजे, धारदार शस्त्रे, वाघांची 3 नखे व 46 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई 23 जुलै रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास करण्यात आली. तसेच तेलंगणा व धुळे (महाराष्ट्र) येथूनसुध्दा संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.

सर्व संशयितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील तरतुदीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.28 जुन 2023 रोजी आसाम राज्यातील गुवाहाटी येथे पोलिस विभाग व आसाम वनविभाग यांच्या संयुक्त कारवाईत वाघाच्या शिकार प्रकरणी हरियाणा राज्यातील बावरीया जमातीच्या तीन व्यक्तींना, वाघाची कातडी व हाडांसह अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून प्राप्त प्राथमिक माहितीच्या आधारे वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो यांनी देशातील सर्व प्रमुख व्याघ्र प्रकल्पांच्या सभोवतालच्या क्षेत्रांत वाघांच्या शिकारीची शक्यता असल्याची सुचना 29 जून 2023 रोजी दिली होती.

त्यानुसार या शिकार्‍यांनी चंद्रपूर व गडचिरोली या परिसरात शिकार केली काय, याची पडताळणी करण्याकरिता व याबाबत अधिक गुप्त माहिती प्राप्त करण्याकरिता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी तीन सदस्यीय पथक गुवाहाटी येथे रवाना केले होते. या पथकाने गुवाहाटी येथे कारागृहात असलेल्या आरोपींची चौकशी केली असता या शिकारी टोळीमधील काही महत्त्वाचे सदस्य गडचिरोली वनविभागाचे क्षेत्रात वावरत असल्याची माहिती समोर आली. या गुप्त माहितीच्या आधारे या सर्व संशयितांवर पोलिस विभागाच्या मदतीने गुप्त पाळत ठेवण्यात आली व त्यांना जेरबंद करण्याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर वनवृत्त व गडचिरोली वनवृत्ताची एक संयुक्त चमू गठीत करण्यात आली.

या चमूद्वारे 23 जुलै 2023 रोजी पहाटे 2 वाजता गडचिरोली जवळ आंबेशिवणी येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित ठिकाणी छापा टाकला. या कारवाई दरम्यान राहत्या झोपडयांमध्ये वाघांच्या शिकारीकरीता वापरण्यात येणारे 6 नग शिकंजे, इतर धारदार शस्त्रे, वाघांची 3 नखे व 46 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच राहत असलेल्या सर्व संशयित 6 पुरुष, 5 स्त्रीया व 5 लहान मुले यांना चौकशीकरीता ताब्यात घेण्यात आले. तसेच संशयितांकडून प्राप्त माहितीच्या आधारे करीमनगर, तेलंगाणा व धुळे (महाराष्ट्र) येथून सुध्दा संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.सर्व संशयित हरयाना व पंजाब या राज्यातील निवासी असल्याचे उपलब्ध माहितीच्या आधारे सिध्द होत आहे.

आरोपींचा आसाम येथे पकडण्यात आलेल्या शिकार प्रकरणी तसेच देशातील विविध भागांतील शिकार प्रकरणांत समावेश असल्याची माहितीही प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याकरीता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व गडचिरोली वनवृत्तातील अधिकार्‍यांचा समावेश असलेले विशेष कार्य दल गठीत करण्यात आले आहे. तसेच गडचिरोलीचे सहायक वनसंरक्षक यांना तपास अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीअंती सर्व संशयितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील तरतुर्दीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

या कारवाईमुळे गडचिरोली व चंद्रपूर तसेच तेलंगाणा राज्यात वाघांची शिकार करण्याचा परप्रांतीय टोळीचा मोठा कट अयशस्वी करण्यात वन व पोलीस विभागास यश मिळाले आहे.ही कारवाई महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता यांच्या मार्गदर्शनात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य ख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक ज्योती बॅनर्जी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक रमेशकुमार, चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी व स्थानिक पोलिस अधिकारी यांनी केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

Latest Marathi News Update live : तो व्हिडिओ माझ्या घरातील, संजय राऊतांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओबाबत संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण

तुम्हीसुद्धा पाणीपुरीचे तिखट पाणी आवडीने पिता का? तर मग 'हे' वाचाच

Janasuraksha Bill : महाराष्ट्रात 'जनसुरक्षा विधेयक' मंजूर ; नक्षलवाद्यांविरोधात होणार कठोर कारवाई